सात वर्षे एकाच ठिकाणी सेवा? दिव्यात हवालदाराच्या बदलीवर नागरिकांचा सवाल
सात वर्षे एकाच ठिकाणी सेवा? दिव्यात हवालदाराच्या बदलीवर नागरिकांचा सवाल
ठाणे | प्रतिनिधी
दिवा शहरातील नागरिकांनी मुंब्रा पोलीस ठाण्याअंतर्गत दिवा पोलीस चौकी येथे कार्यरत हवालदार किशोर वैरागकर यांच्या बदलीची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करत ठाणे शहर पोलीस सहआयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांची प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदन सादर केले आहे. यावेळी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून आवश्यक ती प्रशासकीय कारवाई करण्याचीही मागणी करण्यात आली.
निवेदनानुसार, हवालदार किशोर वैरागकर हे गेल्या सुमारे सात वर्षांपासून दिवा पोलीस चौकीत कार्यरत असून, त्यांच्या दोन वेळा झालेल्या बदलीचे आदेश स्थगित करण्यात आले आहेत. वारंवार बदली स्थगित होण्यामागील कारण स्पष्ट करण्यात यावे, तसेच यामध्ये कोणत्याही प्रकारचा हस्तक्षेप किंवा विशेष सवलत देण्यात आली आहे का, याचीही चौकशी व्हावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
नागरिकांनी त्यांच्या कार्यपद्धतीबाबत विविध तक्रारी असल्याचा दावा करत त्यांच्या मालमत्तेची, आर्थिक व्यवहारांची आणि उत्पन्नाच्या स्रोतांची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही निवेदनात केली आहे.
मागील वर्षी गुरुनाथ पाटील नावाच्या व्यक्तीने कथित हफ्त्याच्या वादातून हवालदार वैरागकर यांच्यावर हल्ला झाला.त्यामुळे पोलिसांची प्रतिमा मलिन झाली. कार्यवाही काहीही झाली नाही.या घटनेनंतरही त्यांच्या बदलीच्या आदेशांची अंमलबजावणी न झाल्याने नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.
यावेळी अमोल धनराज केंद्रे म्हणाले, “आमचा संघर्ष पोलीस दलाविरोधात नाही. उलट खाकी वर्दीचा सन्मान आणि पोलीस दलावरील जनतेचा विश्वास कायम राहावा, हीच आमची भूमिका आहे. प्रामाणिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना आम्ही नेहमीच पाठिंबा देऊ. मात्र, कोणत्याही अधिकाऱ्याच्या वर्तनामुळे पोलीस दलाची प्रतिमा धुळीस मिळत असेल, तर त्या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन दोषींवर कारवाई झालीच पाहिजे.”
या प्रकरणात तातडीने योग्य निर्णय न झाल्यास लोकशाही मार्गाने आंदोलन व उपोषण करण्यात येईल, असा इशारा नागरिकांनी प्रशासनाला दिला आहे.
यावेळी अमोल धनराज केंद्रे, सौ. अश्विनी अमोल केंद्रे, राधा तोरणे, रेणुका कांबळे, बालाजी कदम, प्रदीप गुप्ता, कमल गुप्ता तसेच दिवा शहरातील अनेक नागरिक उपस्थित होते.
दरम्यान, या प्रकरणातील आरोप आणि मागण्या या निवेदन सादर करणाऱ्या नागरिकांच्या म्हणण्यानुसार आहेत. याबाबत संबंधित पोलीस कर्मचारी किंवा पोलीस प्रशासनाची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही.

मुख्य संपादक : वल्लुरी डेव्हिड राव



