क्राईम

दिव्यात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट; प्रशासन झोपेत की संगनमतात?


दिव्यात अनधिकृत बांधकामांचा सुळसुळाट; प्रशासन झोपेत की संगनमतात?

दोषी अधिकाऱ्यांना तात्काळ निलंबित करा – ॲड. रोहिदास मुंडे यांचा संताप

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा ठाणे महापालिका प्रशासनावर थेट हल्लाबोल

दिवा | प्रतिनिधी

दिवा शहरात दिवसाढवळ्या सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामांच्या वाढत्या साम्राज्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला असताना, ठाणे महानगरपालिका प्रशासन मात्र संशयास्पद मौन बाळगून असल्याचा गंभीर आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे कल्याण ग्रामीण विधानसभा उपजिल्हाप्रमुख ॲड. रोहिदास मुंडे यांनी केला आहे.

दिवा विभागात अक्षरशः अनधिकृत बांधकामांचे रॅकेट फोफावत असताना संबंधित अधिकारी मात्र डोळ्यावर पट्टी बांधून बसले आहेत का? असा संतप्त सवाल उपस्थित करत ॲड. मुंडे यांनी ठाणे महापालिका आयुक्तांकडे लेखी तक्रार दाखल करून संबंधित अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, दिवा परिसरातील अनेक भागांमध्ये मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे सुरू असून याबाबत वारंवार लेखी तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही. यामुळे “अधिकाऱ्यांचे आशीर्वाद असल्याशिवाय इतक्या मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे होऊच शकत नाहीत,” अशी संतप्त प्रतिक्रिया स्थानिक नागरिकांमधून उमटत आहे.

या प्रकरणात सहाय्यक आयुक्त शिवप्रसाद नागरगोजे, प्रभाग २७ चे बीट अधिकारी संतोष लहाने, प्रभाग २८ चे बीट अधिकारी सुहास रोकडे आणि प्रभाग २९ चे बीट अधिकारी रुपेश पाटील यांनी आपल्या कर्तव्यात गंभीर दुर्लक्ष केल्याचा आरोप निवेदनात करण्यात आला आहे.

ठाणे महापालिका आयुक्तांना दिलेल्या निवेदनात संबंधित अधिकाऱ्यांच्या भूमिकेची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ निलंबनाची कारवाई करण्यात यावी, तसेच दिवा विभागातील सर्व अनधिकृत बांधकामांवर बुलडोझर चालवून कठोर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

यावेळी ॲड. रोहिदास मुंडे यांनी प्रशासनावर थेट निशाणा साधत म्हटले, “दिवा शहरात अनधिकृत बांधकामांचे अक्षरशः बाजार भरले आहेत. नागरिकांच्या जीवाशी खेळणाऱ्या या बेकायदेशीर बांधकामांकडे प्रशासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असेल, तर ते अत्यंत गंभीर आहे. तक्रारीनंतरही कारवाई होत नसेल तर अधिकाऱ्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात येते. दोषींवर कठोर कारवाई झाली नाही तर शिवसेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.”

दरम्यान, दिव्यात वाढत चाललेल्या अनधिकृत बांधकामांच्या मुद्द्यावरून आता प्रशासन आणि राजकीय पक्ष आमनेसामने येण्याची चिन्हे दिसू लागली असून, ठाणे महापालिका आयुक्त या गंभीर प्रकरणात कोणती भूमिका घेतात याकडे संपूर्ण दिवाकरांचे लक्ष लागले आहे.

#दिवा #अनधिकृतबांधकाम #ठाणेमहापालिका #रोहिदासमुंडे #शिवसेनाUBT #ठाणेन्यूज #महाराष्ट्रनामा #ब्रेकिंगन्यूज #Diva #ThaneNews #UnauthorizedConstruction #ShivSenaUBT


Savdhaan crime

मुख्य संपादक : वल्लुरी डेव्हिड राव

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *